पंढरीत शिवसेनेची जिल्हा आढावा बैठक

पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी एकदिलाने योगदान द्या : शिवसेनेचे सोलापूर जिल्हा निरीक्षक अरविंद मोरे
पंढरपूर प्रतिनिधी---
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समाजातील सर्व घटकांसाठीचे तळमळीने सुरू असलेले कार्य या जोरावर महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचे आहे. त्यादृष्टीने आपसातील मतभेद बाजुला ठेऊन प्रत्येकाने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन शिवसेनेचे सोलापूर जिल्हा निरीक्षक अरविंद मोरे यांनी केले.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघांना भेटी देऊन निरीक्षक मोरे यांनी त्या-त्या ठिकाणची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या दौऱ्यात सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, माजी आ. नारायण पाटील, माजी महापौर दिलीप कोल्हे, भाऊसाहेब आंधळकर, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, चरणराज चवरे, महेश चिवटे, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, महिला जिल्हा प्रमुख राठोड, तालुका प्रमुख शिवाजी बाबर आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते.

यावेळी मोरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अतिशय चांगले काम करीत आहे. अतिशय तळमळीने काम आणि धडाडीच्या निर्णयांमुळे २०२४ मध्येही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील. सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत. ही कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पदाधिकारी, शिवसैनिकांनी करावे. शिवसैनिक हा शिवसेनेचा मुख्य गाभा आहे. त्यादृष्टीने संघटना वाढीसाठी तरुणांना संघटित करावे. आगामी सर्व निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने तयारी करावी.

प्रा.शिवाजी सावंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना आपलेसे वाटणारे नेतृत्व आहे. जनतेसाठी ते अहोरात्र झटत असतात. अतिशय जलद गतीने निर्णय घेत त्यांनी सर्व घटकांना आधार दिला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य, सरकारची धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यादृष्टीने सर्वांनी प्रामाणिकपणे योगदान द्यावे.

प्रास्ताविकात महेश साठे यांनी सध्यस्थितीचा लेखाजोखा मांडला. पक्षबांधणीसाठी सर्वांनी हातात हात घालून एकदिलाने काम करण्याची आवश्यकता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येकाने तन-मन-धनाने झटले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी इतरही पदाधिकाऱ्यांनी विचार व्यक्त केले. बैठकीत निरीक्षक मोरे यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेत चांगल्या गोष्टींचे कौतुक केले. याचवेळी ज्या ठिकाणी आपण कमी पडलो, त्या ठिकाणी दुरूस्ती करण्याच्या सूचनाही दिल्या.
--

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form