मतदारसंघातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा व पाणी नियोजनामध्ये आवश्यक उपाययोजना करा - आ आवताडे

मंगळवेढा प्रतिनिधी - 
गतवर्षी अपेक्षेपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे मतदारसंघातील पाण्याची पातळी खूप कमी झाली असून मतदारसंघाला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा व पाणी टंचाईमध्ये आवश्यक नियोजन करा त्यामध्ये हयगय झाली तर आपण खपवून घेणार नाही अशा सूचना मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी टंचाई आढावा बैठकीमध्ये दिल्या आहेत. आ आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील चारा व पाणी टंचाई आढावा बैठक मंगळवेढा येथे संपन्न झाली. सदर आढावा बैठकीप्रसंगी उपस्थित नागरिकांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार आवताडे हे बोलत होते.

बैठकीच्या प्रारंभी मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव यांनी नियोजित बैठकीचे प्रास्ताविक केले. त्यानंतर मतदार संघातील पाणी, कृषी, पशुसंवर्धन, जलसंधारण, वनीकरण, महावितरण इत्यादी विभागातील संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी पाठीमागील वर्षाचे आढावा सादरीकरण करून केलेल्या उपाययोजनांचा आढावा सर्वांसमोर मांडला. मतदारसंघातील ४० गावे पाणीपुरवठा, म्हैसाळ पाणी योजना, भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच कासेगाव व उंबरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा आधी पाणी योजना संदर्भात उपलब्ध पाणी व नागरिकांची मागणी यांचा समन्वय साधून पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश आमदार आवताडे यांनी दिले आहेत. अगोदरच दुष्काळी पट्टा अशी ओळख असलेल्या या मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या या दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभा राहिले आहे. अशा परिस्थितीमध्ये उदरनिर्वाहाचे अर्थिक उत्त्पन्नचे प्रमुख साधन असलेल्या शेतीच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने फक्त कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांप्रती संवेदनशील भावना ठेवून या दुष्काळाचा सामना करण्यासाठी त्यांना बळ द्यावे असेही आमदार आवताडे यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी उपस्थित शेतकरी व नागरिकांकडून आलेल्या विविध समस्या व अडचणी यांची लेखी निवेदने स्वीकारून आमदार आवताडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यावर कार्यवाही करण्याचे आदेशित केली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे कसलीही कसर अथवा तांत्रिक त्रुटी न ठेवता शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून जास्तीत-जास्त उपाययोजनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष कृतीतून करणे ही या दुष्काळावर मात करण्यासाठी मोठी ताकद ठरणार आहे. या बैठकीवेळी मतदार संघातील अनेक नागरिकांनी आपल्या समाजसेवा अडचणी यांचा अक्षरश: पाढा वाचला असता आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत अशा पद्धतीने कामे कराल तर गाठ माझ्याशी असेल अशी तंबीही आ आवताडे यांनी दिली.

या बैठकीसाठी दोन्ही तालुक्यातील प्रांताधिकारी,  तहसीलदार, कृषी विभागातील अधिकारी पदाधिकारी, महावितरण अधिकारी, जलसंधारण अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी, महसूल, तलाठी, ग्रामसेवक, सर्कल तसेच विविध गावातील सरपंच उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form