पंढरपूर प्रतिनिधी--
निराधार वृद्ध, मनोरूग्ण, परितक्त्या स्त्रिया यांच्यासह एच आयव्ही बाधित बालकांच्या जीवनात पालवी फुलवणार्या मंगलताई शहा यांनी सामाजिक कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. मागील ४० वर्षापासून मंगलताई यांच्या या सेवा कार्याचा दीप अखंडपणे तेवत असून त्यांचे कार्य प्रत्येकाला दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.
वर्षा उसगावकर यांनी नुकतीच पालवी संस्थेला सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.याप्रसंगी उपस्थित बालकांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या मंगलताई व डिंपल यांनी या बालकांवर उत्तम संस्कार केले असून संस्थेतील बालकांच्या कलागुण पाहता यातील काही बालके भविष्यात नक्कीच उत्तम व चांगले कलाकार होतील. वर्षा उसगावकर यांनी पालवी संस्थेतील निराधार घटकांसाठी कार्यरत हिरकणी, श्रावणाश्रम, अपना घर, परिसस्पर्श आदी प्रकल्प पाहून समाधान व्यक्त केले
पालवीतील युवा पिढीने तयार केलेल्या गोधडी, पर्स, फाइल्स,पायपुसणी आदी इको फ्रेंडली वस्तूंच्या दर्जा पाहून त्यांनी या युवकांचे कौतुक केले.यावेळी मंगलताई शहा यांच्यां जीवन प्रवासावर आधारित व 'जोहडकार ' सुरेखा शहा लिखित 'आणि ते मंगल झाले' या पुस्तकाचे प्रत मंगलताई यांच्या हस्ते वर्षा उसगावकर यांना भेट देण्यात आली. याप्रसंगी डिंपल घाडगे, आशिष शहा, पालवीचे समन्वयक तेजस घाडगे व सर्व सहकारी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता