श्री विठ्ठल कारखान्याचे विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सोहळयास प्रारंभ

वेणुनगर, दि.९ - 
कारखाना कार्यस्थळावरील श्री विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम-लक्ष्मण-सीता, मारूती या देवतांची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त व जगद्‌गुरु संत तुकोबाराय यांच्या त्री शतकोत्तर अमृत बिजोत्सावानिमित्तचे औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे याहीवर्षी दिनांक ०९.०५.२०२४ ते १५.०५.२०२४ या कालावधीमध्ये अखंड हरीनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळाचे आयोजन केलेले आहे. त्यानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील सर्व देव-देवतांचे पुजन व सप्ताह प्रारंभाचे कलश पुजन कारखान्याचे संचालक श्री अंगद उध्दव चिखलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. इंदुमती अंगद चिखलकर या उभयतांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कारखान्याचे चेअरमन मा. श्री अभिजीत धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत व ह.भ.प.प्रा.श्री तुकाराम महाराज मस्के, ह.भ.प.श्री आण्णा महाराज भुसनर यांचे नेतृत्वाखाली अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यामध्ये पहाटे ४ ते ६ काकड, सकाळी १० ते १२ संत तुकाराम महाराज गाथा भजन, दुपारी ४ ते ५ हरीपाठ, सायं. ५ ते ७ भागवत कथा, रात्री ८ ते १० किर्तन व रात्री ११ ते ४ हरी जागर इत्यादी दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. त्यामुळे परिसरातील भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन कारखाना परिसर भक्तीमय झालेला आहे. तसेच सायं ५ ते ७ या वेळेमध्ये ह.भ.प. संगीत विशारद भागवताचार्य सौ. राणीताई सिदवाडकर करकंब यांचे भागवत कथा ज्ञानयज्ञाचेही आयोजन केलेले आहे. सदर कथेच्या श्रवणास कारखाना कॉलनी व परिसरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सप्ताहामध्ये कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी अन्नदान करणेसाठी मोठा सहभाग नोंदविलेला आहे.

सदर कार्यक्रमासाठी सर्व मा. संचालक मंडळ, प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड, सभासद, अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत हरीनाम सप्ताहाचा शुभारंभ संपन्न झाला. भाविक भक्तांनी किर्तन, भजन व भागवत कथेचा लाभ घ्यावा असे प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांनी आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form