सांगोल्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठीच निवडणुका लढवल्या - आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला (प्रतिनिधी): रविराज शेटे
मी कार्यकर्त्यांवर प्रामाणिकपणे प्रेम करतो. कार्यकर्त्यांनी देखील माझ्यावर जीवापाड प्रेम केले आहे. शेकाप मधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने शिवसेनेला नवी पालवी फुटली आहे. स्व.गणपतराव देशमुख यांची राजकारणात प्रचंड ताकद होती, मात्र, स्व.गणपतराव देशमुख यांचा पराभव करण्यासाठी मी कधीही निवडणुक लढवली नाही. तर सांगोला तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठीच निवडणुका लढवल्या. शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत विश्वासात घेऊन सन्मानाची वागणूक दिली जाईल असे आश्वासन आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडले असून अजनाळे गावातील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम करीत पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. वर्षानुवर्षे शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सध्याचे शेकापचे नेतृत्व सापत्नपणाची वागणूक देत असल्याने शेकापचे कार्यकर्ते नाराज झाले होते. पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने अखेर शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, मी पाण्यासाठी संघर्ष करीत असताना टेंभू आलं म्हणून शेकापच्या कार्यकर्त्यांनी माझी वारंवार चेष्टा केली, मी अपमान, अहवेलना सहन केली. या तालुक्याचा दुष्काळाचा नायनाट करण्याची जिद्द मनात होती. १९९५ साली पहिल्यांदा आमदार झाल्यावर टेंभू, म्हैसाळ, शिरभावी पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतल्या. मतदारसंघातील विकास कामांसाठी अडीच वर्षात ५५०० हजार कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. तालुक्यातील मतदारांनी ५५ वर्षे शेकापला एक हाती सत्ता दिली, मात्र, दोन वर्षेच मंत्रिपद मिळाले, याशिवाय तालुक्याला काहीही मिळालं नाही. शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांनी मतदारसंघात एकही काम केले नाही. माळशिरसकरांनी कायमच तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्यायच केला आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत सन्मानाची वागणूक दिली जाईल असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
अजनाळे गावातील शेतकरी कामगार पक्षाचे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन हमूनाना येलपले, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन प्रदीप लाडे, संतोष कोळवले, प्रकाश येलपले, अशोक कोळवले, सुनील येलपले, भारत येलपले, पिंटू येलपले, साधू कोळवले, उमेश येलपले, अनिल लाडे, प्रवीण येलपले, श्रीमंत शिंदे, दत्तात्रय शेंबडे, विजय लाडे, सज्जन भंडगे, अंकुश शेंबडे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, विजयदादा शिंदे, प्रकाश सोळसे, गणेश कुरे, पांडुरंग मिसाळ, बाळासाहेब आसबे, विजय येलपले, , दादासाहेब वाघमोडे, दीपक ऐवळे, बापू कोळवले, पांडुरंग लाडे, संभाजी कोळवले, महादेव पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाराव खरात यांनी केले.
Tags
राजकीय वार्ता