विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर व दर्शन रांगेत 120 सीसीटीव्हिची करडी नजर

यात्रा कालावधीत विविध घटनांच्या घडामोडीवर सीसीटीव्हीची नजर  -  कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके.
पंढरपूर (ता.08):- 
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड आदी ठिकाणांतील घटना , घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कायम स्वरुपी व तात्पुरत्या स्वरूपात असे एकूण 120 ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे  बसविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
            संबधित ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे परीक्षण करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि श्री संत तुकाराम भवन येथे असे दोन नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) तयार करण्यात आले आहेत. या नियंत्रण कक्षामध्ये 24 तास सीसीटीव्ही ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली असून, या यंत्रणेची l जबाबदारी अनुभवी संगणक तज्ञ तथा विभाग प्रमुख राजेंद्र घागरे यांना देण्यात आली आहे. याशिवाय, पोलीस प्रशासनाकडून देखील कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आलेली असून सीसीटीव्हीरुपी तिसऱ्या डोळ्याचा वॉच परिसरावर राहणार  आहे.

          कार्तिकी वारीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे़. या सर्व भाविकांचे सुलभ व जलद गतीने दर्शन व्हावे, यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये, भाविकास काही शारीरिक त्रास झाल्यास तात्काळ आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देणे, कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडू नये व इतर अनुषंगिक घडामोडींवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. मंदिर, मंदिर परिसर, दर्शन रांग व इतर ठिकाणी काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास किंवा काही सूचना द्यावयाच्या असल्यास नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे संवाद साधून तात्काळ आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सीसीटीव्हीची खूप मोठी मदत होत आहे. याशिवाय, कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या कार्यालयात देखील या कॅमेऱ्यांचा अक्सेस दिला असल्याने त्यांना मुख्यालयात बसून सर्व घडामोडी पाहता येत आहेत. 

                भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज होती, त्या त्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आयपी, अनॉलॉग व  मेगापिक्सल नाईट व्हिजनचे अत्याधुनिक कॅमेरे आहेत. या सर्व कॅमेराद्वारे चित्रित केलेला डाटा देखील सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था निर्माण केलेली आहे. संबधित कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करीत असल्याने कोणताही परिसर त्याच्या नजरेतून सुटत नाही. त्यामुळे भाविकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार असून, आवश्यक ठिकाणी भाविकांना तात्काळ मदत देखील करता येणार असल्याचे  व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form