काँग्रेस संपुर्ण ताकतीने भगीरथ भालकेंच्या पाठीशी : खासदार प्रणिती शिंदे
पंढरपूर प्रतिनिधी--
मतदार संघातील जनतेने मला ४५ हजार मताचे मताधिक्य दिले आहे. त्याची परतफेड ही उमेदवारी मिळवून थोडीफार केली आहे. काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालकेच असून काँग्रेस त्यांच्या संपूर्ण ताकतीने पाठीशी आहे. आपले पाठबळ असेच राहुद्या, असे आवाहन उपस्थित जनसमुदायाला खा. प्रणिती शिंदे यांनी केले.
त्या महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ बुधवारी माचणूर येथे झाला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर खासदार प्रणीती शिंदे, माजी आमदार दिलीप माने, चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, व्हा. चेअरमन तानाजी खरात यांच्यासह पंढरपूर मंगळवेढ्यातील कारखान्याचे आजी माजी संचालक, नगरसेवक, आघाडीच्या मित्रपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवार भगीरथ कुटुंबीय व्यासपीठावर स्व.आ. भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांनी आपण सगळे माझे कुटुंब आहात, असे म्हणत माझा भगीरथ आजपासून आपल्या ओटीत दिला आहे. त्याला मोठा आशीर्वाद देऊन आमदार करा, असे आवाहन मतदारांना केले. यावेळी डॉ. प्रणिता भालके व कुटुंबातील महिला उपस्थित होत्या.
भालके यांनी जनता माझी कवचकुंडले आहेत. स्व. भारत नानांनी जपलेली नाती मी टिकवून ठेवली आहेत. माझी उमेदवारी धोक्यात आणण्यासाठी उचल गँग निर्माण झाली. त्यांना हात जोडून विनंती केली. पण त्यांनी प्रामाणिकपणे पैशाचा धर्म पाळला. आघाडीचा निर्णय दोन दिवसात नाही झाल्यास मोहोळ व माढ्यात वेगळी भूमिका जनता घेईल. त्यावेळी माझा इलाज चालणार नाही, असा इशारा त्यांनी राष्ट्रवादीला दिला. पंढरपूर तालुक्यातील सगळे प्रश्न तसेच आहेत. जातीमध्ये सलोखा राहिला नाही. या सगळ्या गोष्टींचा हिशोब येत्या २० तारखेला मतरुपी आशीर्वाद देऊन आपण करावा, असे आवाहन भालके यांनी केले. चेतन नरोटे यांनी भालके यांना शुभेच्छा देत धनगर समाजाच्या मतदारांना भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची विनंती केली. प्रास्ताविकात पांडुरंग चौगुले यांनी स्व. भारत भालके यांच्या तिन्ही निवडणुकीमध्ये असेच उमेदवार उभा करून अडचणी आल्या होत्या. पोटनिवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करूया, असे आवाहन केले. यावेळी नंदकुमार पवार, गणेश पाटील, रणजित बागल, शिवाजी काळे, समाधान फाटे, किरणराज घाडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष ॲड. राहुल घुले, विठ्ठलचे संचालक तानाजी बागल, उल्हास शिंदे, समाजसेवक नागेश जाधव, सागर यादव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.आभार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी मानले.
Tags
राजकीय वार्ता