*वारकरी भाविकांना केंद्र बिंदू मानून सोई सुविधा*
*मंदिर जिर्णोद्वार, जतन व संवर्धन कामास सुरवात*
*श्रींच्या नित्योपचाराबरोबर अन्य प्रथा परंपंरांचे कटाक्षाने पालन*
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे कामकाज पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 अन्वये चालविण्यात येते. तथापि, मे. सर्वोच्च न्यायालयाच्या माहे जानेवारी, 2014 मधील निर्णयाने सदर कायद्याची संपूर्णपणे अंमलबजावणी होऊन श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन आलेले आहे. त्यास दि.17 जानेवारी रोजी 11 वर्षे पूर्ण होत आहेत.
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे श्री. विठ्ठल रूक्मिणीचे पंढरपूरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील 36 परिवार देवता, तसेच पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवता यांचे व्यवस्थापन करण्याचे कामकाज आहे. यासर्व देवदेवतांची पुजा-अर्चा आदी दररोजचे नित्योपचार, नैमत्तिक उपचार मंदिरात व मंदिराबाहेरील परिवार देवतांच्या मंदिरात साजरे करण्यात येणारे यात्रा व उत्सव, वर्षातून चार वेळा येणा-या आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार मोठ्या यात्रा कालावधीत भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात असते. शासनाने या मंदिरांचे संपूर्ण व्यवस्थापन करणेकामी सन 2017 मध्ये पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 च्या तरतुदीनुसार समिती नियुक्त केली आहे व या समितीला सल्ला देण्यासाठी सल्लागार परिषद देखील शासनाने गठीत केली आहे.
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे महाराष्ट्र्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधित आहेत. त्यामुळे श्रीचे नित्योपचार अत्यंत काटेकोरपणे, हजारो वर्षाच प्रथा व परंपरांची सांगड घालून वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे. कामातील त्रुटींमुळे भाविकांच्या श्रध्देला तडा जाणार नाही यासाठी पुरेपर दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच वारकरी सांप्रदयाचे श्रींच्या नित्योपचाराबरोबर अन्य प्रथा परंपंरा यावर कटाक्षाने लक्ष्य असते. पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार पुजा परंपरेनुसार करण्यात येत आहेत. दैनंदिन पूजोपचार कोणत्याही प्रकारचे खंड न पाडता किंवा व्यत्यय न आणता मंदिरात कर्मचा-यांकडून पार पाडण्यात येत आहेत. तसेच श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची नित्यपुजा, पाद्यपुजा, महानैवेद्य सहभाग योजना, तुळशी अर्चन पुजा, चंदनउटी पुजा इत्यादी पुजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या पुजा बुकींगसाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, ऑनलाईन पध्दतीने नोंदणी घेण्यात येत आहे. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे पुरातन, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्व असणारे मंदिर आहे. त्याच्या संवर्धनाचा व जिर्णोद्वाराचा आराखडा तयार करून पुरातन विभागामार्फत शासन निधीतून मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरू करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मंदिरास प्राचीन मुळ रूप प्राप्त होईल. तसेच पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवतांच्या मंदिरांचा देखील या आराखड्यात समावेश आहे. दर्शनरांगेत भाविकांचे ऊन वारा पाऊस इत्यादीपासून संरक्षण करणे करणेकामी बॅरेकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, स्कायवॉक, उड्डाणपूल, पायांना खडे टोचू नये म्हणून मॅटींग, विश्रांती कक्ष, आपत्कालिन दरवाजे, हिरकणी कक्ष, मोफत अन्नछत्र, एकादशीला शाबुदाणा खिचडी वाटप, द्वादशीला तांदळाची खिचडी, मिनरल वॉटर व चहा वाटप, ऑनलाईन /ऑफलाईन देणगी व्यवस्था, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, मोबाईल बंदी, चप्पल स्टँड, लाईव्ह दर्शन, रूग्णवाहिका, अपघात विमा पॉलीसी, शववाहिका, वॉटर एटीएम, प्रथमोपचार केंद्र, मोबाईल लॉकर्स, लाडूप्रसाद, फोटो विक्री, माहिती कक्ष, स्थानिकांची दर्शनाची सोय इ. उपक्रम सुरू केले आहेत.
आपत्कालिन व्यवस्थेच्या दृष्टीने 100 सीसीटीव्ही कॅमेरे, तात्काळ संपर्कासाठी 25 वायरलेस सेट, प्रवेशद्वाराजवळ बँग स्कॅनर मशिन व मेटल डिटेक्टर मशिन बसविण्यात आल्या आहेत. तसेच आषाढी यात्रा कालावधीत सन 2018 पासून श्री.विठ्ठल निर्मिल दिंडी पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. मंदिरात विविध सण व उत्सवानिमित्त फुलांची आरास व विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. तसेच भाविकांना चांगल्या दर्जाची निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 350 खोल्यांची सुसज्ज अशी श्री.विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाची इमारत उभी केली. यामध्ये तबक उद्यान, उद्वाहन, ऑनलाईन बुकींग, गरम पाण्याची सोय, उपहारगृह, हॉल, प्रशस्त पार्किंग, वातानुकुलित यंत्रणा व इतर अनुषंगीक अशा अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. या इमारतीस ग्रीन बिल्डींग प्रमाणपत्र मिळाले असून, असे प्रमाणपत्र मिळालेली जिल्ह्यातील ही एकमेव इमारत असावी. याव्यतिरिक्त, वेदांता व व्हिडीओकॉन भक्तनिवास देखील उपलब्ध असून, या तिन्ही भक्तनिवासातून 1500 भाविकांची निवासाची सोय होत आहे.
श्री संत तुकाराम भवन येथे भाविकांना दररोज दुपारी 12.00 ते 2.00 व सायंकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत मोफत भोजनप्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. त्याचा सुमारे सुमारे 3000 भाविक लाभ घेतात. यामध्ये रू.7000/- भरून इच्छीत दिवशी अन्नदान करता येते. तसेच श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद अल्प देणगी मुल्य आकारून उपलब्ध करून देण्यात येतो. तसेच मंदिर समितीची पंढरपूर नगरपरिषद हद्दीत यमाई तलाव येथे गोशाळा असून, या गोशाळेत लहान-मोठी सर्वसाधारणपणे 250 गाई-वासरे आहेत. या गाईंपासून मिळणा-या दुधाचा वापर श्रींच्या नित्योपचारासाठी व अन्नछत्रामध्ये करण्यात येतो. तसेच गोशाळेचा विकासात्मक आराखडा तयार करण्यात आला असून, जागा मागणीकामी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
मंदिर समितीच्या राज्यात विविध ठिकाणी जमिनी आहेत. त्यांचे एकूण क्षेत्र हेक्टर 469.66 आर इतके आहे. सदरच्या सर्व जमिनी राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या आहेत. त्यामध्ये 31 तालुके, 87 गावे व 236 गट आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विभागामध्ये सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्हृयामध्ये तसेच अमरावती, बुलढाणा नागपूर, यवतमाळ, अकोला, नगर जिल्हयामध्ये आहेत. ताब्यात घेतलेल्या जमिनी शेतक-यांना लिलाव पध्दतीने 11 महिन्यांसाठी खंडाने देण्यात येत आहेत. सदर जमिनीतून उत्पन्न वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. श्रीस परिधान करण्यात येणारे मौल्यवान दागदागिन्यांचे मुल्य, अमुल्य असून सदरचे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहे, यासर्व अलंकाराचे जतन करण्यात आले आहे. तसेच भाविकांकडून आतापर्यंत सुमारे 42 किलो सोने व 1 हजार 241 किलो चांदीच्या भेट वस्तू प्राप्त झालेल्या आहेत. पंढरपूर नगरपरिषद हद्दीत मंदिर प्रदक्षिणा मार्ग, पालखी प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट इत्यादी ठिकाणची स्वच्छता, पंढरपूर ते मंगळवेढा या पालखी महामार्गावरील व पंढरपूर शहरातील वृक्षांची देखभाल तसेच पंढरपूर शहरातील पुरग्रस्तांना फुड पॅकेट वाटप करण्यात आले.
मंदिर समितीच्या 270 कर्मचा-यांची सेवा संरक्षित करून 7 वा वेतन आयोग लागू केला आहे व त्यांना गणवेश, ओळखपत्र, अनुकंपा, सेवानिवृत्तीनंतर मदत, सेवा शर्ती लागू करणे, प्रशिक्षण, कर्तव्य सुची निश्चिती, विमा पॉलीसी अशा प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, लेखा अधिकारी ही पदे शासन नियुक्तीवर भरण्यात आली आहेत. तसेच कामकाजात सुसुत्रता आणण्याच्या दृष्टीने संगणक प्रणाली विकसित करण्यात येत आहे.
श्रींच्या दर्शनरांगेत कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकामास शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून, सदर कामास लवकरच सुरवात होत आहे. तसेच तिरूपती व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर टोकन व्यवस्था सुरू करणे वारकरी सांप्रदयाच्या संत वाड्मयाचे व भागवत धर्माचे संशोधन व अभ्यास करण्यासाठी व त्यास प्रसिध्दी देण्यासाठी व त्यांचा प्रचार करण्यासाठी ‘‘संत तुकाराम महाराज संतपीठ’’ या नावाची परिसंस्था स्थापन करणे, अत्याधुनिक पध्दतीच्या इस्पितळाची निर्मिती शासनाच्या मदतीने राबविण्याचा मानस आहे.
या सर्व कार्यास वारकरी भाविकांकडून चांगले दान मिळत आहे. मंदिर समितीचे वार्षिक अंदाजपत्रक 60 ते 65 कोटी आहे. राज्य शासन, सर्व महाराज मंडळी, मंदिर समितीचे व सल्लागार परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य - अधिकारी, वारकरी, भाविक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणा-या व्यक्तींचे चांगले सहकार्य लाभत आहे. वारकरी भाविकांच्या सेवेसाठी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य आ.रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे ही मंदिर समिती कार्य तत्पर असून, श्रींच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना चांगल्या व अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील.
Tags
सामाजिक वार्ता