पंढरपूर (ता.06) -
चैत्र शुध्द नवमीला प्रतिवर्षीप्रमाणे विठ्ठल सभामंडपामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठलास उपवासाचा महानैवेद्य दाखवून दुपारी 12.00 वा. पांढरा पोशाख, पागोटे व साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून राम जन्मोत्सव सोहळा पार पडल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
यावेळी राम जन्माची कथा होऊन प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला. तसेच श्री. विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह.भ.प.श्री. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे श्री. विठ्ठल सभामंडप येथे श्री. रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय, रामनवमी जन्मोत्सवा निमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्राच्या भोजनप्रसादामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता, सुमारे 2000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.
Tags
सामाजिक वार्ता